जळगाव : प्रतिनिधी
शेतातून मोटर बंद करून मित्रासोबत घरी पायी जात असताना भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे किशोर दयाराम चव्हाण (५५, रा. भोकर, ता. जळगाव) हा शेतकरी ठार झाला. हा अपघात गुरुवार, ४ एप्रिल रोजी रात्री जळगाव ते चोपडा रस्त्यावर भोकर गावाजवळील एका नर्सरीनजीक झाला. याप्रकरणी शुक्रवार, ५ एप्रिल रोजी तालुका पोलिस ठाण्यात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील भोकर येथील किशोर चव्हाण यांचे गावानजीक शेत आहे. गुरुवार, ४ एप्रिल रोजी शेतातून पाण्याची मोटर बंद करून त्यांचे मित्र नीलेश शंकर गिरनारे यांच्यासोबत जळगाव ते चोपडा रस्त्यावरून घरी जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमपी ६८ झेडबी ८७०४) चव्हाण यांना जोरदार धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. तर दुचाकीवर मागे बसलेला चार ते पाच वर्षांचा बालक जखमी झाला. याप्रकरणी नीलेश गिरनारे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दुचाकीचालक मन्साराम प्रकाश बारेला (रा. मध्य प्रदेश, ह.मु. खर्डी, ता. चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोणे करीत आहेत.