भुसावळ : प्रतिनिधी
विहिरीचे खोदकाम करीत असताना मातीचा काही भाग खचला. त्यामुळे खोदकाम करणारा मजूर ३० ते ४० फूट खोल असलेल्या विहिरीच्या ढिगाऱ्याखाली अडकला. भुसावळ पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तब्बल तीन तासाच्या परिश्रमानंतर या मजुराला सुखरूप बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. वरणगाव रोडवर लकीबानगर येथे शनिवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील शशिकांत श्रीकांत तायडे (वय ३५) असे या मजुराचे नाव आहे. उन्हाळ्यामुळे भुसावळला पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लकीबानगरातील एका घरमालकाने रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील काही मजूर विहिरीच्या कामासाठी बोलावले होते. विहिरीतील कचरा काढण्यात आला. यानंतर विहिरीच्या निम्म्या भागावर सिमेंटचा धापा टाकण्यात आला. याच भागात तायडे हे काम करीत असताना मातीचा काही भाग कोसळला. त्यासोबत तायडे हेही खाली कोसळले आणि ते ढिगाऱ्याखाली अडकले.
ही घटना त्वरित नगरपालिका अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी पवन भंगाळे, दिनेश पुरोहित, गजानन जावळे हे काही वेळातच घटनास्थळी पोहचले. त्यांनी ३० ते ४० फूट खोल ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तायडे यांना तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढले. यात तायडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दुपारी दोन वाजता सुरू झालेले बचाव ऑपरेशन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती..