भुसावळ : प्रतिनिधी
फायनान्सचे हप्ते न भरल्याच्या कारणावरून युवकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी माजी नगरसेवक पुत्रासह पाच जणांविरुद्ध बुधवारी (दि.२७) बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील इमामवाडा येथील अझहर खान सलीम खान (३३) या युवकाने फायनान्स कंपनीकडून हप्त्यावर फ्रीज घेतला आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे दोन हप्ते भरता आले नाहीत. याबाबत वसीम शेख शफी याने २४ रोजी सायंकाळी पाच वाजता जाब विचारल्यानंतर अझहरने धंदा व्यवस्थित सुरू नाही, खूपच अडचण आहे. मात्र मागील हप्ते व चालूचा हप्ता लवकरच भरण्यात येईल, असे सांगितल्याचा वसीमला राग आल्याने त्याने अझहरला शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत पोलिसांत तक्रार करू, असे अझहरने सांगितल्यानंतर आरोपीने जेथे जायचे तेथे जा, असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी अझहर हा कुटुंबासह रमजानचा उपवास सोडत असताना वसीम व इतर साथीदार हे तेथे आले व त्यांनी अझहरची पत्नी व आईला शिवीगाळ केली. तसेच पोलिसात गेल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. घाबरलेला अझहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाल्यानंतर पाच ते दहा संशयितांनी दुचाकीवरून सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. तक्रारदार बाजारपेठ पोलिसा ठाण्यात पोहोचल्यानंतर आरोपी तेथेही पोहोचले. हे पाहून अझहर पोलिसा उपअधीक्षक कार्यालयात पोहोचला यावेळी पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी घडला प्रकार जाणून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी वसीम शेख शफी, बिदू शेख शफी, दानिश शेख सलीम बिसमिल्ला शेख शेख रहिम, इमामा शेख गफूर (सर्व रा. जाम मोहल्ला भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.