भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील शांतीनगर परिसरातील शिक्षक कॉलनीत मारुती मंदिराच्या आवारात असलेल्या ट्रॉन्सफॉर्मरने पेट घेतल्याने या परिसरात पाच टीव्ही, चार फ्रीज, पाच एसी, ३० पेक्षा जास्त लाइट, पाण्याचे पंप, संगणक जळाले आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे या भागातील रहिवाशांचे सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगरातील शिक्षक कॉलनी भागात असलेल्या मारुतीच्या मंदिराच्या आवारात वीज कंपनीची डीपी बसविली आहे. या डीपीवर मोठ्या प्रमाणावर झाडे आणि वेली वाढलेल्या आहे. डीपीवर वाढलेल्या वेलींमुळे तेथे शॉर्टसर्किट होताच डीपीने पेट घेतला. डीपीने पेट घेताच या भागातील अनेक घरांमध्ये सुरू असलेले टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, संगणक व लाइट जळून खाक झाले. वीजपुरवठा खंडित झाला.
यामुळे या भागात अंधार होऊन एकच खळबळ उडाली. या भागातील रहिवाशांनी वीज कंपनीला फोनवर माहिती दिल्यावर कंपनीचे आधिकारी तेथे दाखल झाले. रात्री वीजपुरवठा सुरू झाल्यावर घरातील उपकरणे जळाल्याचे समोर आले.