भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील महेशनगरात माईंड केअरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर भुसावळ येथील पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी छापा टाकून विशाल बहाटे व पल्लवी बहाटे या दाम्पत्याला अटक केली. या दाम्पत्याला मंगळवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील उच्चभ्रू महेशनगरातील एका बंगल्यात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विशेष पथकाने छापेमारी करत पाच तरुणींची सुटका केली होती.
यावेळी दोन ग्राहकांना ताब्यात घेतले होते. पुणे, नगर, कोल्हापूर, सोलापूर भागांतील पाच तरुणींना देहविक्रीसाठी प्रोत्साहित करून त्यांच्याकडून गेल्या काही महिन्यांपासून हा व्यवसाय सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी विशाल व पल्लवी बहाटे या दाम्पत्याविरोधात पीटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. शहरात आणखी काही ठिकाणी असे प्रकार सुरु आहेत का, याबाबतही तपास केला जात आहे.