जळगाव : प्रतिनिधी
कामावरून काढून टाकल्याचा राग आल्याने तीन जणांनी कंपनीचे व्यवस्थापक चेतन पुंडलिक सोनवणे (३२, रा. भोकर, ता. जळगाव) यांच्यासह दोन जणांना मारहाण केली. तसेच सोनवणे यांच्यावर धारदार चाकूने वार करत दुखापत केली. ही घटना १ मार्च रोजी कानळदा गावाजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोकर येथील चेतन सोनवणे हे एका कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांनी महेश भरत सोनवणे (रा. कानळदा, ता. जळगाव) याला कंपनीतून काढून टाकले होते. व्यवस्थापक सोनवणे व त्यांचे मित्र विशाल बाबुलाल सोनवणे व सचिन देवीदास सोनवणे हे १ मार्च रोजी कानळदा येथील सरकारी दवाखान्याजवळून जात असताना महेश सोनवणे याच्यासह अन्य दोघांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. महेशने चाकू काढून चेतन यांच्यावर वार केले. यामध्ये त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.