जळगाव : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणीला वेग आला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ५ मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. १५ फेब्रुवारी रोजी अमित शाह हे दौऱ्यावर येणार होते. मात्र, हा दौरा स्थगित करण्यात आला होता. आता ५ मार्च रोजी अकोला, जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथे अमित शाह यांच्या सभा होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर दुपारी १ वाजता अमित शाह यांच्या उपस्थितीत युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. खासदार उन्मेष पाटील यांनीदेखील अमित शाह यांच्या ५ मार्च रोजी होणाऱ्या दौऱ्याला दुजोरा दिला आहे.
भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘क्लस्टर’ ही संकल्पना राबविली आहे. एका क्लस्टरमध्ये चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. जळगाव क्लस्टरमध्ये जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार या चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. या क्लस्टर अंतर्गत जळगावला दि. ५ रोजी अमित शाह हे भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह युवकांसोबत संवाद साधणार आहेत.