मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी हे चिन्ह पक्षाला बहाल केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचे मूळ चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. तर राज्यसभा निवडणुकीपूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष’ हे नाव शरद पवार गटाला दिले होते. त्यानंतर निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे. हे चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर प्रतिक्रिया देताना कविता पोस्ट केली आहे.