भुसावळ : प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेच्या आवारात चोरीच्या घटनांविरोधात मोहीम उघडली आहे. यात गेल्या तीन दिवसात रेल्वे प्रवाशांकडील मोबाईल चोरणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफ कर्मचारी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त घालत असतात. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ही कारवाई करण्यात आली. भुसावळ स्थानकावर आरपीएफ आणि सीपीडीएस कर्मचाऱ्यांना स्थानकाच्या परिसरात एक जण संशयास्पद फिरताना आढळला. कृष्णा सावंत नावाच्या आरोपीने सचखंड एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीवरुन भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या एकास पकडण्यात आले. समीर पठाण असे या आरोपीचे नाव आहे. त्याने अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात झोपलेल्या प्रवाशाकडून मोबाईल चोरल्याची कबुली दिली.
कुर्ला येथे एका संशयित व्यक्तीला पाठलाग करुन पकडण्यात आले. रिझवान शेख याने एका प्रवाशाकडून मोबाईल चोरल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून रु. २२,९९९/- किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच अंबरनाथ स्थानकावर दीपक वाघरी नावाच्या आरोपीस पकडण्यात आले. चौकशी त्याने प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून २ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कल्याण स्थानकात दशरथ ठाकूर नावाच्या मोबाईल चोरास पकडण्यात आले. त्याच्याकडून रु.३१,८००- किमतीचे २ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.