पाचोरा : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध वाळू वाहतूकीचे वाहन सुरु असल्याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळताच कारवाई करण्यात येत आहे. नुकतेच पाचोरानजीक वाळू वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी जप्त केला. दरम्यान घटनेनंतर मालक फरार झाला असून पोलिसांनी डंपरचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोऱ्यात अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू असून, दररोज शंभरहून अधिक वाहने गिरणा नदीपात्रातील वाळू उपसा करीत आहेत. तहसीलदार नसल्याने पाचोरा महसूल विभाग वाऱ्यावर आहे. कारवाई होत नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी दि. ९ रोजी मध्यरात्री १:३०च्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना इंपरविषयी माहिती दिली. त्यावेळी (एमएच ४६ बीएफ ५०२१) या ३ ब्रास वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठलाग करीत जप्त केला. घटनेनंतर इंपरमालक फरार झाला आहे. चालक फारूक भिकन पिंजारी (२९, खडकी अंतुर्ली) याच्याविरुद्ध पाचोरा पोलिसांत पो. कॉ. दीपक सूरवाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.