जळगाव : प्रतिनिधी
नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी ट्रॅक्टरवरून लाकडं घेऊन जात असताना, मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर तापी नदीत कोसळल्याची घटना नांद्रा येथे गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडली. या घटनेत ट्रॅक्टरचालक वासुदेव गोपीचंद सपकाळे (वय ४२, रा. नांद्रा खु. ता.जि. जळगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे वासुदेव गोपीचंद सपकाळे हे पत्नी चंद्रभागा सपकाळे, आई मंगलाबाई सपकाळे, दोन मुलं हितेश व रितेश आणि एका मुलीसह वास्तव्याला होते. नांद्रा गावात त्यांच्या मामीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या दशक्रियेचा शुक्रवारी कार्यक्रम असल्याने वासुदेव सपकाळे हे गुरुवारी दुपारी लाकडे घेण्यासाठी ट्रॅक्टरवर एकटेच गेले होते. लाकडं भरून नांद्रागावाकडे तापी नदीच्या रस्त्याने येत असताना अचानक त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. यामुळे त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर थेट तापी नदीत कोसळले. या अपघातात वासुदेव सपकाळे पाण्यात पडले आणि त्यांच्या डोक्यावर ट्रॅक्टरचे स्टेअरिंग पडल्याने ते गंभीर जखमी झाले.