भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंप्री सेकम, फुलगावच्या जवळ शेत रस्त्यावर वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने दि. १ रोजी रात्री अडवले. या वाहनाच्या चालकाला वाहन तहसील कार्यालयात नेण्याची सूचना केली. मात्र वाहन चालक ऐकण्यास तयार नव्हता. त्याचवेळी तेथे २५ ते ३० जणांचा जमाव आला. आणि कारवाईला विरोध करत होता. महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांची मदत घेतली. पोलिस घटनास्थळी आल्यावर जमाव पांगला आणि वाहन तहसील कार्यालयात नेण्यात आले.
तापी पात्रामध्ये अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करीत असताना महसूल विभागाच्या पथकाने किरण संतोष सूर्यवंशी रा. रामपेठ, वरणगाव याच्या मालकीचे ट्रॅक्टर पकडले. दरम्यान मदतीसाठी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हिसका दाखवताच वाहन चालकाने ट्रॅक्टर भुसावळ तहसील कार्यालयात आणले. ही कारवाई अधिकारी अर्पित चव्हाण, तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी प्रवीण पाटील, रजनी तायडे, फिरोज खान, तलाठी मिलिंद तायडे, नितीन केले, कोतवाल जितेश चौधरी, राज भालेराव यांनी केली. दरम्यान या घटनेची दिवसभर तालुक्यात चर्चा होती.