मुंबई : वृत्तसंस्था
देशातील काही राज्यात राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच आता सर्वच पक्षाच्या वतीने हालचाली देखील वाढल्या आहेत. महायुतीने तशा दृष्टीने तयारी देखील सुरू केली आहे. तर 5 जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठीचा निर्धार महायुतीने केला आहे.
निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाने मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. भाजपने तर त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली असल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. आता केंद्रीय नेतृत्व लवकरच नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांकडून दिली जात आहे.
एकीकडे भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असताना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार कोण असतील याचीही चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळू शकते असा अंदाज आहे.तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील 287 आमदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीत विजयासाठी 42 मतांचा कोटा आवश्यक आहे. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत 16 आमदार आहेत. तर, राष्ट्रवादीतील 42 आमदार हे अजित पवारांसोबत आहेत. राज्यसभेच्या 6 पैकी 5 जागा जिंकून आणत महायुती अभेद्य आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षाचा असणार आहे. त्यामुळे महायुतीला किती यश मिळतेय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.