भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील साकेगाव येथे बसस्टॅन्ड चौकात महामार्गाखाली असलेल्या ३.५ मीटर उंचीच्या बोगद्यात कापसाने भरलेले एक छोटा ट्रक अडकला. हा ट्रक बोगद्यात शिरल्यावर मागील भाग बोगद्यात अडकला. यामुळे हा दोन पायावरील घोड्याप्रमाणे उभा झाला. हा विचित्र प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, साकेगाव बसस्थानक चौकात असलेल्या महामार्गाखालील उड्डाणपुलाची फक्त साडेतीन मीटर उंची ठेवण्यात आल्यामुळे अंडरपास मधून वाहने अडकतात हे नित्याचेच प्रकार झाले आहेत. रविवारी २८ रोजी संध्याकाळी पाच वाजता साकेगाव येथील हेमंत वाघ या शेतकऱ्याचा कापूस जळगावकडे ट्रकने नेला जात असताना महामार्ग खालील बोगद्यात शिरल्यावर कापसाने भरलेला मागील भाग हा बोगद्याच्या सुरुवातीलाच अडकला. यामुळे पाहणाऱ्यांची गर्दी झाली. हा ट्रक बाहेर काढण्यासाठी गावातील नागरिकांच्या मदतीने बराच वेळेपयर्यंत प्रयत्न सुरु होते. यामुळे या बोगद्यातून जाणाऱ्या इतर वाहनधारकांची गैरसोय झाली.