भुसावळ : प्रतिनिधी
भरधाव चारचाकी वाहन दुभाजकावर आदळल्याने चालक देवेंद्र जालंदर पवार (२१, रा. साक्री फाटा भुसावळ) हे ठार झाले. हा अपघात बुधवार, १७ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रात नोकरीला असलेले देवेंद्र पवार हे बुधवार, १७ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता चारचाकी वाहनाने (क्र. एमएच १९, सीवाय ९६१६) भुसावळ येथून दीपनगर येथे जात होते. दीपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन दुभाजकावर आदळले. यात देवेंद्र यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मित्र परिवार व नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.