छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ग्रामीण भागासह शहरी भागात अल्पवयीन मुलीवर विनयभंग, अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ५० वर्षीय व्यक्तीने मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग आणि दोन वेळा गैरवर्तन केलं. आपल्या मुलीला झालेला त्रास लक्षात येताच तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपी काका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलगी तिच्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती. यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत काकाने तिच्याशी गैरवर्तण केलं. त्यामुळे मुलगी सतत घाबरून राहत होती. काकाने अतिप्रसंग आणि गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याने ती कुणाशीच काही बोलत नव्हती. आपल्या लेकीला अचानक काय झालं या विचाराने तिची आई देखील चिंतेत होती.
मुलीला काही त्रास होत आहे का? तिची तब्येत ठिक नाही का? याबाबत आईने तिच्याकडे चौकशी केली. मात्र चिमुकली काहीही सांगत नव्हती. शेवटी आईने तिला विश्वासात घेतलं आणि तिच्याशी बातचीत केली. त्यावेळी तिने घडलेली संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली. घडलेली घटना ऐकून आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नराधम काकाला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं. घटलेली घटना पोलिसांना सांगितली त्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात काका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी या व्यक्तीला अटक देखील केली आहे.