मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन हिवाळ्यात आलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होईल, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच हवामान खात्याने देशातील ३१ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवार आणि शनिवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन, खंडवा, झाबुआ, इंदूर, धार, बुरहानपूर, बरवानी, अलीराजपूर, नीमच, मंदसौर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.