नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात नव्या वर्षाचे जंगी स्वागत होत असतांना जपानमध्ये पहिल्याच दिवशी भूकंपाचे धक्के बसले होते हि घटना ताजी असतांना आता जपानची राजधानी टोकियो येथील हानेडा विमानतळावर एका विमानाला आग लागली. जपानी न्यूज एजन्सी क्योडोने दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगपूर्वी हे विमान तटरक्षक दलाच्या विमानाला धडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत.
या दुर्घटनेत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. जपान एअरलाइन्सच्या (जेएएल) प्रवक्त्याने सांगितले की, होक्काइडो येथील शिन-चितोसे विमानतळावरून निघालेल्या विमानात सुमारे 367 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. सर्वांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, यात कोणी जखमी झाले आहे की नाही, याबाबत माहिती मिळालेली नाही. जपानचे परिवहन मंत्रालय या प्रकरणाची चौकशी करत आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, जेएएलचे फ्लाइट न्यू चिटोस विमानतळावरून (जपानी वेळेनुसार) दुपारी चार वाजता निघाले. 5:40 वाजता ते टोकियोला उतरणार होते. विमानाला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.