भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ येथील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून आठ लाखांच्या पॉवर केबल चोरीत रेल्वे सुरक्षा बलाच्या हवालदाराचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरपीएफच्या हवालदारासह तिघांना रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटकेतील संशयितांमध्ये सचिन उत्तम तायडे (वय २५, रा. महादेव टेकडी, हनुमान मंदिर, कंडारी, ता. भुसावळ), राहुल रतन मोरे (वय २३, रा. महादेव टेकडी, हनुमान मंदिर कंडारी) व आरपीएफचे हवालदार शशिकांत गणपत सुरवाडे (वय ५७, रा. स्वामी विहार, भुसावळ) यांचा समावेश आहे.
दरम्यान, भुसावळातील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून ७ लाख ९४ हजार २२७ रुपयांची १ हजार ६०४ किलो पॉवर केबल चोरीला गेल्याचा प्रकार १५ ते १६ डिसेंबरदरम्यान उघडकीस आला होता. तत्पूर्वी पीओएच कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरा, लेबर मेन गेट व सायकल स्टॅण्ड गेट, वर्कशॉप फेसिंग कॅमेरा, इरेक्शन फेसिंग कॅमेरा यांच्याशी छेडछाड केल्याची बाब ११ नोव्हेंबर रोजी स्पष्ट झाल्यानंतर संशय बळावला व त्यानंतर केल्यानंतर त्यात लाखोंची यंत्रणेचा साहित्य तपासणी महागडी पॉवर केबल चोरीला गेल्याचे समोर आले.
दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाचे डीएससी एच. श्रीनिवासराव व एएससी अशोक कुमार यांच्या नेतृत्वात चोरीच्या तपासासाठी एका पथकाची निर्मिती करण्यात आली. त्यात सीआयबी निरीक्षक एल. के. सागर, एसआयबीचे आशित खरमाटे, वसंत महाजन, अमोल शेख, विनोद पाटील, मनोज सोनवणे, इम्रान खान, महेंद्र बाबू कुशवाह, कॉन्स्टेबल गिरीराज जाधव, कॉन्स्टेबल नीलेश पाटील यांचा समावेश होता. विशेष पथकाने तपासादरम्यान पीओएचमधील कंत्राटदार अंजूम पटेल यांच्याकडे काम करणारा राहुल रतन मोरे यास सुरूवातीला संशयित म्हणून ताब्यात घेतले. संशयित राहुल मोरची कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीत सचिन तायडे याचे सहकार्य लाभल्याचे सांगितल्याने. त्यास अटक केली. तर दोघा संशयितांच्या कबुली जबाबात आरपीएफचे हवालदार शशिकांत सुरवाडे यांनी गुन्ह्यात मुद्देमाल विक्रीतून आलेली निम्मे रक्कम स्वीकारल्याचे व चोरीला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी रेल्वे न्यायालयात अॅड. अजयकुमार सिंग यांनी रेल्वे सुरक्षा बलाची बाजू मांडली असता न्यायाधिशांनी त्यांना ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे