यावल : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात अपघाताच्या घटना सुरु असतांना नुकतेच यावल तालुक्यातील निमगाव येथे यावल ते भुसावल मार्गावरील पाटील यांच्या शेताजवळ रस्त्यावर उस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील निमगाव येथील आनंद रघुनाथ सोनवणे (वय १२) हा २० डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उभा होता. या वेळी यावल येथून भुसावळ मार्गे मुक्ताईनगर येथे उस वाहतूक करणाऱ्या महेंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर (एमएच- १९, डीएफ- २५३५) जात होते. दरम्यान, निमगाव जवळ नयनसिंग खुबसिंग पाटील यांच्या शेताजवळील रस्त्यावर या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याने आनंदा सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मयत आनंदचे काका किरण फकिरा कोळी यांच्या फिर्यादीवरुन यावल पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक सोनू छोटू पारधे (रा. डोडीकर, ता. चाळीसगाव) याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी उमेश सानप करत आहेत. दरम्यान, मयत आनंद सोनवणे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात डॉ. प्रशांत जावळे यांनी केले.