जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नागझिरी गावाजवळील गिरणा नदी पात्रात एका ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून नजीक असलेल्या नागझिरी गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात एका बाजूला अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा पाण्यात तरंगताना मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या संदर्भात धानोरा गावाचे उपसरपंच अनिल भील यांनी जळगाव तालुका पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे आणि अनिल मोरे यांच्यासह इतर कर्मचारी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या घटनेबाबत दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांनी मयताची ओळख पटवावी असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.