भुसावळ : प्रतिनिधी
अनेक ग्रामीण भागातून गोपनीय मार्गाने शहरात बेकायदेशीर पिस्तुल विक्रीसाठी येत असतात भुसावळ शहरात देखील दोन पिस्तुल विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलिसांनी एकावर कारवाई करीत अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरातील २९ वर्षीय तरुण भुसावळ शहरात गावठी पिस्तूल खरेदी करण्यासाठी आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून साठ हजार रुपयांचे दोन गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आले आहेत. तर शस्त्र विक्री करणारा भुसावळातील संशयित पसार झाला आहे. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यात योगेश नंदू सांगळे (२९, रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सांगळे यास ताब्यात घेतले आहे.