भुसावळ : प्रतिनिधी
शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चारचाकी वाहनात आलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकासह दोघांना गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसांसह अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकाच्या केला सायडींगजवळ ही कारवाई गुरुवारी पावणेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. योगेश महेश वंजारे (बौद्ध विहार, खडका, ता. भुसावळ) व विशाल भीमराव साळुंखे (वीटभट्टी ताजी, धुळे, ह.मु. खड़का सबस्टेशनजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर झायलो मालक विलास सपकाळे (शांती नगर, भुसावळ) हे पसार आहेत.तिन्ही संशयितांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहराचे निरीक्षक गजानन पडघण यांना गावठी पिस्टलासह संशयित येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. रेल्वे केलास सायडींगजवळ गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास संशयित झायलो (एम. एच.१९ बी. जे. ८१९९) मधून आल्यानंतर त्यांना पोलिसांना अडवत वाहनातील दोघा संशयितांची झडती घेत त्यांच्याकडून कट्टा तसेच पाच जिवंत काडतूस जप्त केले. एक गावठी बनावटीचा कट्टा त्याचा बॅरल १६.५ सेमी लांबीचा त्यास पकडण्यास प्लॅस्टीकचे काळे आच्छादन असलेली मुठ त्यावर दोन्ही बाजुस लाल रंगाचे स्टार कव्हर असलेला व लोखडी बॉडी असलेला मॅगझीनसह किं.अ. पंधरा हजार किंमतीचे पाच जिवंत राउंड प्रत्येकी ०२.५ सेमी लांबीचे पितळी बॉडी असलेले त्याच्या पाठीमागे इंग्रजीमध्ये के. एफ ७६५ असे उमटवलेले एक महीद्रा झायलो मॉडेलची पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन जप्त केली आहे.
संशयितांनी हा कट्टा व झायलो वाहन विलास सपकाळे यांचे असल्याचे सांगितल्याने भुषण लिलाधर चौधर शहर पोलिस स्टेशन भुसावळ त्यांच्या फिर्यादीवरून गुरन २३८ / २०२३ शख अधिनीयम कलम ३/२५ भादवी कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद, सहाय्यक फौजदार जाकीर सैय्यद, हवालदार सुपडा पाटील, नाईक विकास बाविसकर, कॉन्स्टेबल भूषण चौधरी आदींच्या पथकाने केली.