जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यात महसूलसह पोलीस विभागात मोठय संख्येने कारवाई होत आहे. अशीच एक कारवाई जळगाव शहरात देखील झाली आहे. जळगाव जिल्हा कारागृहातील कैदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या आईकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना सुभेदार भीमा उखई भिल, पोलिस कर्मचारी पूजा सोपान सोनवणे व हेमलता गयबू पाटील हे धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात दि. ८ नोव्हेबर रोजी अडकले. यातील हेमलता पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी तक्रारदार महिला मुलाला भेटण्यासाठी जिल्हा कारागृहाजवळ आल्या होत्या. त्यावेळी ड्युटीवर असलेले सुभेदार भीमा भिल, पूजा सोनवणे, हेमलता पाटील यांच्यासह इतर जण होते. त्यावेळी मुलाला भेटण्यासाठी महिलेकडून दोन हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार महिलेने याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी सापळा रचला. त्यावेळी कारागृह पोलिस पूजा सोनवणे, हेमलता पाटील यांनी सुभेदार भीमा भिल यांच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेकडून २ हजार रुपयांची लाच मागितली. त्याच वेळी धुळे पथकाने हेमलता पाटील यांना रंगेहात पकडले.