जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एका परिसरात बाधकाम करणाऱ्या परीवारातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील हातवारे करीत, तिचा विनयभंग करण्यासह याविषयी जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबाला मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली. ही घटना शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खान्देश मिल कॉलनी परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी एका बांधकामाच्या ठिकाणी कुटुंबासह राहते. याच परिसरात राहणारे दोन जण गेल्या काही महिन्यांपासून या अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करीत तिची छेड काढत होते. शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही मुलगी रस्त्याने घरी जात असताना या दोघांनी तिचा हात पकडून विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी पीडित मुलीचे वडील गेले असता, त्याचा राग आल्याने दोघांनी व त्यांच्या अनोळखी मित्रांनी त्यांना तसेच मुलीच्या आईला विटांनी मारहाण केली.