जळगाव : प्रतिनिधी
येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त केला आहे. अकोला ते भुसावळ दरम्यान ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या शौचालयात दोन बेवारस गोण्या आढळून आल्या होत्या. त्याची तपासणी केली असता त्यात २ लाख ६२ हजारांचा गांजा आढळून आला. ही कारवाई शुक्रवारी दि.२७ रोजी आचेगाव रेल्वेस्थानकादरम्यान करण्यात आली.
रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजय पाटील आणि जितेंद्र इंगळे हे शुक्रवारी (त. २७) श्र्वानपथकासह गांधीधाम एक्स्प्रेस (२०८०३) मध्ये ड्यूटीवर असताना आचेगाव स्थानकावरून गाडी सुटताच श्र्वानाला (वीरू) उग्र वासामुळे कोच क्रमांक एस ९ च्या पुढच्या बाजूला वॉशरूममध्ये दोन बेवारस संशयास्पद गोण्या आढळून आल्या. ही माहिती विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षामार्फत वरिष्ठांना कळवून या गोण्या भुसावळ फलाट क्रमांक चारवर उतरविण्यात येऊन सीसीटीव्हीच्या सर्व्हर रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
यावेळी निरीक्षक आर. के. मीना, उपनिरीक्षक के. आर. तरड, उपनिरीक्षक अनिलकुमार तिवारी, उपनिरीक्षक विनोद खरमाटे एसआयबी, बीएसएल, एएसआय वसंत महाजन, बीएसएल, एचसी विजय पाटील, एचसी योगेश पाटील आणि जीआरपी भुसावळचे एचसी धनराज लुले या ट्रेनच्या कोचमध्ये उपस्थित होते. या दोन्ही गोण्या नायब तहसीलदार, उपनिरीक्षक तसेच छायाचित्रकार यांच्या समक्ष उघडल्या असता त्यात १३ बंडल २६ किलो गांजा आढळून आला.