मनमाड : वृत्तसंस्था
रेल्वेने जळगाव ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी संशयावरून पकडल्यानंतर त्याच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे लाखोंचे घबाड सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोठी रक्कम असल्याने सदर संशयितास पुढील कारवाईसाठी आयकर विभागाकडे देण्यात आल्याची माहिती मनमाड रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीपकुमार देसवाल यांनी दिली.
हावडा – मुंबई मेल व्हाया नागपूर या गाडीने रेल्वे सुरक्षा बलाचे गस्तीपथक कर्तव्य बजावत असताना मनमाडजवळ त्यांनी एका व्यक्तीला संशयास्पद सामानासह पकडले. चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत काहीही माहिती उघड केली नाही. शिवाय जवळील रोकड आणि सामानाबाबत काहीही समाधानकारक उत्तर दिले नाहीत. म्हणून रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने संशयित व्यक्तीला मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातील पोलीस स्थानकात आणले व त्याची कसून चौकशी केली. त्याने आपले नाव हरिश्चंद्र खंडू वरखडे, (वय ६४, रा. देऊळअली, जि. सातारा) असल्याचे सांगितले. तो या गाडीने जळगाव ते मुंबई असा प्रवास करत होता. यावेळी पंचांसमक्ष त्याच्याकडील बॅग उघडली असता त्यामध्ये ६१ लाख ३९ हजार रुपये इतकी मोठी रोकड आणि ८ तोळे सोने आढळले.
रोकड मोठी असल्याने रेल्वे सुरक्षा बलाने रोख रक्कम आणि दागिन्यांसह या व्यक्तीला आयकर विभाग नाशिकचे उपसंचालक सचिन पुसे यांच्याकडे सुपूर्द केले. संबंधित अधिकारी त्याला घेऊन नाशिककडे रवाना झाले. आयकर विभाग या प्रकरणाचा आता पुढील तपास करणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीपकुमार देसवाल यांनी दिली. ही कारवाई सहायक सुरक्षा आयुक्त जयप्रकाश मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीपकुमार देसवाल, एएसआय गणेश कुमारवत, एस. डी. दुबे आदींनी केली. रेल्वे प्रवासी गाडीमधून यापूर्वीदेखील अनेक वेळा अवैधप्रकारे तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर धावत्या रेल्वेमध्ये घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, एवढी मोठी रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन हा माणूस का आणि कसा प्रवास करत होता, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.