चोपडा : प्रतिनिधी
शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयाजवळील महालक्ष्मी नगरातील महिला पायी फिरत असताना त्यांच्या गळ्यातील दुचाकीवरील दोघांनी सोन्याची पोत तोडून धरणगावच्या दिशेने पोबारा केला होता. चोपडा पोलिसांनी त्यांना सेंधव्यातून मुद्देमालासह अटक केली आहे.
माहीती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक कृषीकेश रावळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील व सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण, पोउनि घनश्याम तांबे, हवालदार विलेश सोनवणे, मिलिंद सपकाळे व इतर कर्मचाऱ्यांनी धरणगाव व शिरपूर रस्त्यावर नाकाबंदी करून आरोपींचा वेले निमगव्हाण गावापर्यंत शोध घेतला होता. संशयितांना शुक्रवारी चोपडा न्यायालयात हजर केले असता १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. धूम गैंगप्रमाणे महिलेच्या अंगावरील सोने तोडून पसार होणारी टोळी यामुळे सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. या संशयित दोघांनी जिल्ह्यात काम केल्याचे चौकशीतून निषन्न झाले आहे. यामुळे अधिकचा तपास पोलिस पथककाडून सुरू आहे. असे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी यावेळी सांगितले.
चोपडा येथे पोत चोरीप्रकरणी दोघे आरोपी वरला व सेंधवा मध्यप्रदेशातील असल्याची माहिती गुप्त माहिती मिळाल्याने तत्काळ सपोनि संतोष चव्हाण, पोलिस नाईक संतोष पारधी, हवालदार लव सोनवणे यांच्या पथकाने सेंधव्यातून संशयित कुवरसिंग गंगाराम खरते (वय २३, रा. गुडागांव, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश), सियाराम पांडीया ज़ुकटे (वय १९, रा. कुडवाझिरा ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महिलेची सुमारे १ लाख ३२ हजाराची पोत, मोटारसायकल, मोबाइल असा एकूण १ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मध्यप्रदेशातील या दोघांनी काही ठिकाणी गुन्हे केले आहेत. यामुळे अजून हि गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.