मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील माळेगाव येथील जंगलात मैत्रिणीसह एकांतात गप्पा करीत असलेल्या दोघांना चौघांनी धमकावत मारहाण केली तसेच त्यांच्याकडील दोन मोबाईल रोकड व कानातील सोन्याच्या दागिण्यांसह 22 हजारांचा ऐवज लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवार, 3 जुलै रोजी दुपारी अडीच वाजता घडली. या घटनेने खळबळ उडाली असून चौघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, बर्हाणपूर तालुक्यातील खडकोद येथील बाळू दिनकर वाघ (वय २८) हा तरुण इलेक्ट्रीशियन व प्लबिंग कामे करतो. सोमवार, 3 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बाळू हा तरुण आपल्या मैत्रिणीसह मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव जंगल परीसरात फिरण्यासाठी आल्यानंतर दोघे जंगलात गप्पा करीत असतानाच चौघा अनोळखींनी त्यांना सुरूवातीला धमकावत दहा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, सहा हजारांची रोकड तसेच एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने असा एकूण बावीस हजार रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावला तसेच मारहाणही केली. भेदरलेल्या युवक-युवतीने या घटनेनंतर मुक्ताईनगर पोलिसात धाव घेत आपबिती सांगितल्यानंतर अज्ञात चौघांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.