भुसावळ : प्रतिनिधी
महावितरण कंपनीच्या शहर उपविभाग कार्यालयांतर्गत शिवाजीनगर कक्षात कार्यरत एका कर्मचाऱ्यास असताना मारहाण झाली. हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सर्व कर्मचारी पोलिस ठाण्यात एकवटले होते. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार रोशन इंदुरकर व योगेश लासुरकर हे रात्री वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवाजीनगर भागात गेले होते तेथे विकी देवपुजे नामक तरुणाने वारंवार वीजपुरवठा खंडित का होतो, अशी विचारणा केली. यावर कर्मचाऱ्यांनी फिडर ब्रेक डाऊन झाल्याने व्यत्यय आल्याचे सांगितले. यावेळी दुसऱ्या ठिकाणचा पुरवठा खंडित झाल्याचा निरोप आल्याने तेथे जाण्यास निघाल्याचा राग आल्याने देवपूजे याने लासुरकर यांना मारहाण केली.
या घटनेचा महावितरण कंपनीच्या भुसावळ विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. आज सकाळी दहा वाजता सर्व कर्मचारी बाजार पोलिस ठाण्यात एकवटले व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महावितरण कंपनीचे कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात. तांत्रिक कारणामुळे विज पुरवठा खंडीत होत असतो मात्र याचा फटका कर्मचाऱ्यांना बसतो. ही घटना पहिल्यांदाच घडली असे नाही. यापूर्वी सुद्धा घटना घडल्या असून त्यावर अंकुश लावण्याची मागणी होत आहे.