भुसावळ : प्रतिनिधी
एका २८ वर्षीय तरुणाचे दुर्देवी निधन झाल्याची घटना घडली आहे. पुण्याहून आपल्या १५ दिवसांची चिमुकली पाहण्यासाठी व आजीच्या तेराव्यासाठी आलेल्या तरुणाचा उष्माघाताने सोमवारी दुपारी येथे मृत्यू झाला. गिरीश शालिग्राम पाटील (वय २८) असे मृताचे नाव आहे. तो पुणे येथे रेल्वेच्या सेवेत कार्यरत होता.
आपल्या आजीच्या तेराव्यासाठी तो ९ रोजी भुसावळ येथे आला होता. गिरीश याला पंधरा दिवसांपूर्वीच मुलगी झाली असून, १४ रोजी पत्नी व बाळाला पाहण्यासाठी तो जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे गेला होता. त्यानंतर, नशिराबाद येथे नातेवाइकांकडे गेला होता. १५ रोजी सकाळी त्याची प्रकृती बिघडल्यावर दुपारी त्याला डॉ. मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दुपारी २ वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली