भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील साक्री फाट्यावर १४ एप्रिलच्या रात्री झालेल्या गोळीबारात दोघेजण जखमी झाले होते. या दोघांवर मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना २२ रोजी सकाळी त्यापैकी एकाच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यूची बातमी समजली आहे. परंतु अधिकृत अशी कागदपत्रे अजूनही आमच्या ताब्यात आलेले नाहीत.
१४ एप्रिल रोजी साक्री फेकरी दीपनगरजवळील उड्डाणपूल असलेल्या रस्त्यावर रात्री स्विफ्ट गाडीने वरणगावकडे जाणाऱ्यांवर गोळीबार केला होता. अक्षय सोनवणे याच्या पोटात, तर मंगेश काळे यांच्या छातीत गोळी लागली होती. त्यांच्यावर सर्वप्रथम गोदावरी रुग्णालयात उपचार करण्यात आले व पुढील उपचारांसाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २२ रोजी उपचार सुरू असताना सकाळी अक्षय सोनवणे याचा मृत्यू झाला. याबाबत डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी जखमीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. मात्र, त्यासंबंधित कागदपत्रे अजूनही आलेली नाहीत, असे सांगितले. तर पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी या वृत्ताला होकार दिला आहे.
या प्रकरणात करण सपकाळे (२४), संतोष सपकाळे (५९) व जीवन सपकाळे (२८) या तिघांनी गोळीबार केला होता. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३२६, ३४१, ३४ सह ३, २५, २७ आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.