जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एका रस्त्यावरील शेतात दोन तरुणांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे भुसावळ तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले होते. तर जखमी तरुणांना रूग्णालयात दाखल केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळील एका शेतात दोघा तरुणांवर तीन संशयीतांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडत गोळीबार केल्याने भुसावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांच्या गोळीबारात अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (24, भुसावळ) हे दोघे तरुण जखमी झाले असून त्यांना डोक्याला व पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराचे कारण अस्पष्ट असलेतरी समजलेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगेश व अक्षय आदी दुचाकीने जेवणासाठी निघाल्यानंतर साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळील एका शेतानजीक तरुणांवर हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडल्याने दोघे तरुण जखमी झाले. दोघा तरुणांवर अज्ञातांनी गोळीबार माहिती तालुका पोलिसांना कळाल्यानंतर भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, भुसावळ तालुका निरीक्षक विलास शेंडे, सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे व तालुका पोलीस ठाण्याच्या सहकार्यांनी धाव घेतली. अक्षय सोनवणे या तरुणाला सुरूवातीला गोदावरीत हलवण्यात आले असून या तरुणाच्या पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे तर दुसरा जखमी मंगेश काळे याच्या डोक्याला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्यावरही गोदावरीत उपचार सुरू आहेत.