भुसावळ : प्रतिनिधी
यंदा उन्हाळ्यातही ढगाळ वातावरण कायम असल्याने तापमान ३८ अंशांच्या वर गेले नव्हते, मात्र गुरुवारी भुसावळला ४२.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ही शासकीय नोंद असली तरी एका खासगी संस्थेने भुसावळला ४४ अंश तापमानाची नोंद केली आहे.
उन्हाळा सुरू होऊन दोन ते अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. फेब्रुवारी व मार्च या महिन्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे शहराचे तापमान ४० अंशाच्या आतच होते. त्यामुळे उन्हाच्या झळा नागरिकांना बसत नव्हत्या. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये भुसावळ शहराचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. १३ रोजी भुसावळ शहराचे तापमान कमाल ४२.९ किमान ३२.१ तापमानाची नोंद केली आहे. तर वेलनेस वेदर या खासगी संस्थेने भुसावळ शहराचे तापमान ४४ अंशांवर गेले असल्याची नोंद केली. तापमानात झालेल्या वाढमुळे दुपारी १२ वाजेनंतर रस्त्यांवर शुकशुकाट असतो. गुरुवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात सूर्यास्तानंतर विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली दिसून येत होती.