भुसावळ : प्रतिनिधी
भरधाव एस.टी.बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोदवड तालुक्यातील मनुर गावातील तिघे युवक जागीच ठार झाले. हा अपघात १३ सोमवार रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास वरणगावजवळील सुसरी शिवारात घडला. या अपघाताने बोदवड तालुक्यातील मनेर बु.॥ गावात मोठी शोककळा पसरली आहे. सचिन राजेंद्र शेळके (२६), भागवत प्रल्हाद शेळके (४३) व जितेंद्र कैलास चावरे (३२, तिघे रा.मनुर बु.॥, ता.बोदवड) अशी मयतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनुर बु.॥ येथील तरुणाचा वरणगावजवळील पिंपळगाव येथे सोमवारी विवाह असल्याने वर्हाडी जमले होते तर मनुर गावातील तिघे भावकीतील तरुणही लग्नस्थळी आले होते व लग्नाला दुपारी अवकाश असल्याने वरणगावातील नागेश्वर मंदिरावर दर्शनासाठी जातो म्हणून सचिन शेळके याने आपले काका विजय शेळके यांना सांगितले व अन्य दोघे मित्र असलेल्या नातेवाईकांसह दुचाकी (एम.एच.19 सी.एस.1198) ने वरणगावकडे येत असताना भरधाव भुसावळ-देवळरगाव बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.0948) ने समोरून जोरदार धडक दिल्याने तिघे तरुण रस्त्यावर फेकले. बसची धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा चक्काचूर झाला तर बसचादेखील चालकाकडील भाग चेपला गेला. या अपघातात डोक्याला अधिक मार लागल्याने व रक्तस्त्राव झाल्याने दोघा तरुणांचा जागीच मृत्यू ओढवला तर भागवत शेळके हा बोलण्याच्या अवस्थेत असल्याने त्याने घडलेल्या अपघाताची माहिती दिल्यानंतर त्यास वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले असता उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली.