अमळनेर : प्रतिनिधी
येथील आधार बहुउद्देशीय संस्था सध्या तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमधे जाऊन नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी केली जात आहे. आतापर्यंत दत्त विद्या मंदिर पातोंडा, आदर्श विद्यालय अंमळगाव, शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे, माध्यमिक विद्यालय वावडे, अंतुर्ली, मंगरूळ, सारबेटे, गडखांब आश्रम शाळा, रणाईचे या सह एकुण २७ शाळांमधे डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. इ. ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करून, डोळ्यांचा नंबर काढणे, नंबर लागला तर मोफत चष्मा बनवून देणे व ठराविक विद्यार्थ्यांमधे काही विशेष बाब आढळून आल्यास सदर विद्यार्थ्यांस अमळनेर येथील डाॅ राहूल मुठे यांच्याकडे आधार बहुउद्देशीय संस्थेमार्फत मोफत उपचार करवून घेत आहे अशी माहिती आधार संस्थेच्या निकीता पाटील यांनी दिली. सदर नेत्रतपासणी शिबिरांमधे सरासरी जवळपास ३५ ते ४० टक्के विद्यार्थ्यांमधे डोळ्यांचे पाणी गळणे , डोळे चुळचुळ करणे, डोळ्यांची जळजळ होणे , डोके दुखणे, लांबचे कमी दिसणे, भुरसट दिसणे आदी समस्या उद्भवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आधारावर दत्त विद्या मंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप शिंगाणे व पर्यवेक्षक व्हि सी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर टाळावा याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.
” मोबाईल व टीव्हीचा अतीवापर, मुलांच्या आहारात पालेभाज्यांचे कमी प्रमाण, विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात मोबाईल पाहिल्याने मोबाईलच्या तीव्र प्रकाशामुळे मुलांना डोळ्यांचे विकार जडत असल्याचे शिबिरांमधे निष्पन्न होत आहे.”
– अभिनव मुंदडा, नेत्रतंत्रज्ञ, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर
डिजीटल लाॅकडाऊन संकल्पना –
विद्यार्थ्यांसह पालकांनी आता डिजीटल लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असून दररोज संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत घरात मोबाईल व टीव्हीचा वापर पुर्णपणे बंद करावा व दर रविवारी मुलांना मोबाईल व टिव्ही न पाहू देता मैदानी खेळ खेळण्यावर भर द्यावा. मुले ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली पालकांकडे मोबाईल मागणी करतात. आता शाळा ऑफलाईन सुरू असल्याने शिक्षकांनी देखील गरजेशिवाय ऑनलाईन अभ्यास देणे टाळल्यास मुले लवकरच डोळ्यांच्या या सर्व समस्यांमधून बाहेर येतील अशी संकल्पना प्रा. भुषण बिरारी यांनी मांडली आहे.