जळगाव : प्रतिनिधी
शहरातील समता नगरातील तरुणाने महाबळ परिसरातील त्र्यंबकनगरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना 4 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार कांतीलाल मोहन पवार (वय 28) रा. समतानगर हा आई, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्याला आहे. हात मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवार 6 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आईसोबत कामावरून येत असताना दुकानावर जोतो असे आईला सांगून गेला. त्यानंतर महाबळ रस्त्यावरील त्र्यंबकनगरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर जावून तेथून त्याने उडी घेत आत्महत्या केली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तपासणी अंतिम वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन विसपुते यांनी मयत घोषित केले. कांतीलालने आत्महत्या का केली याचे कारण मात्र मिळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच नातेवाईंकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. यावेळी आई व बहिणीचा अक्रोश उपस्थितांचा मनहेलावणारा होता. कांतीलाल याच्या पश्चात आई उषाबाई, पत्नी राणी, मुलगा जयेश (वय-3) आणि तीन बहिणी असा परिवार आहे.



