जळगावः प्रतिनिधी
गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या उत्खनन करुन वाळुची वाहनातून चोरटी वाहतूक खेडी खु. शिवारातून केली जात होती. पोलिसांचे पथक दिसल्यानंतर वाहने सोडुन चालक पसार झाले. ट्रॅक्टर, ट्रक तसेच डंपर आणि त्यात भरलेली वाळु असा सुमारे १७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळुन आला. याप्रकरणी संशयित चालकांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास खेडी खु. (ता. जळगाव) शिवारातील गिरणा नदी पात्रातून वाळु भरुन चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह पथक रवाना झाले. वाळुची चोरटी वाळु वाहतूक करत असताना पोलीस पथक दिसले. कारवाईच्या भितीतून चालकांनी वाहने जागेवर सोडुन पलायन केले.
दोन लाख किमतीचे ट्रॅक्टर (एमएच १९ एएन ४४३०), तीन लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच १९ झेड २७९४), साडेतीन लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच १९ झेड ४२२८), तीन लाख रुपये किमतीचे ट्रक (एमएच १९ जे ०३१०), साडेतीन लाख किमतीचे डंपर (एमपी ०४ जीए २१८८), अडीच लाख किमतीचे डंपर (एमएच १९ सीडब्ल्यू ३६३६) असा एकूण १७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला.
याप्रकरणी तक्रारीनुसार सतिष कुंभार (रा. प्रजापतनगर), गणेश कोळी (कानसवाडा), अब्दुल करीम शेख (आव्हाणे), रवींद्र जाधव (वाघनगर), रितेश कोळी (विदगाव), विशाल सपकाळे (रा.कंडारी), भुषण सपकाळे (खेडी खु.) यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार योगेश पाटील हे तपास करीत आहेत.



