

जळगाव : प्रतिनिधी
रथोत्सवात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविल्याची घटना दि. २१ रोजी सायंकाळी दाणा बाजार परिसरात घडल्या. पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून काढण्यात आलेल्या रथ पाहण्याकरीता भाविकांनी दुपारपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, याच गर्दीचा फायदा घेत शहरातील दाणा बाजारातील अन्नदाता हनुमान मंदिर परिसरात चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातून सोन्याचे पोत लांबविल्याच्या घटना घडल्या. पाच महिलांच्या गळ्यातून चोरट्यांनी १९.५ ग्रॅम वजनाचे एकूण ९७ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने लंपास केले असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी मनिषा महेंद्र मिस्तरी (रा. वाघोळ, ता. रावेर) यांच्या गळ्यातून ३ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, मगला अनिल देसाई (रा. उल्हासनगर) यांच्या गळ्यातून ४ ग्रॅमचे मंगळसूत्र, सुष्मा अमोल राणा (रा. शिवाजी नगर) यांच्या गळ्यातून ५ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, चित्रा उमाकांत अमृतकर (रा. पोलन पेठ) यांच्या गळ्यातून ४ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र व सुलोचना अशोक सोनवणे (रा. सत्यमपार्क) यांच्या गळ्यातून साडेतीन ग्रॅमचे मंगळसूत्र असा एकूण १९.५ ग्रॅमचे दागिने चोरुन नेले.



