

सुरतमध्ये धक्कादायक घटना; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, १३ वर्षीय मुलाने पाईपच्या आधाराने वाचवला जीव
सुरत : वृत्तसंस्था
कामाच्या शोधात घराबाहेर पडलेल्या जळगाव परिसरातील एका कुटुंबावर सुरतमध्ये काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ चार जणांनी कुटुंबाची कार अडवून सदस्यांना जबरदस्तीने खाली उतरवले आणि खोल कालव्यात फेकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत आतापर्यंत एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचे असे तिघांचे मृतदेह आढळले असून, दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेमुळे जळगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे जळगाव परिसरातील असलेले हे कुटुंब एरंडोल येथील एका कारखान्यात मजुरीचे काम करत होते. २१ नोव्हेंबर रोजी कामाच्या शोधात हे कुटुंब कारने सुरतकडे निघाले होते. दरम्यान, त्यांची कार बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळील कालव्याजवळ पोहोचली असता दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांचा रस्ता अडवला. आरोपानुसार, या चौघांनी कुटुंबातील सदस्यांना कारमधून जबरदस्तीने खाली उतरवले आणि एकामागून एक खोल कालव्यात फेकले. यावेळी १३ वर्षीय मुलाच्या हाताला कालव्यातील एक पाईप लागला. त्याच पाईपचा आधार घेत त्याने आपला जीव वाचवला. त्यानंतर जवळच असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचून त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. महुआ तालुक्यातील डुंगरी परिसरातील काकरापार कालव्यात शोध घेतला असता एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचे मृतदेह आढळून आले. कुटुंबीयांनी मृतांची ओळख पटवली. नितीन पाटील आणि कविता पाटील अशी मृतांची नावे असून, तिसऱ्या मृत व्यक्तीची ओळखही कुटुंबीयांनी पटवली आहे. या घटनेतून १३ वर्षीय मुलाचा जीव वाचला असला, तरी कुटुंबातील अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांकडून कालव्यात शोधमोहीम राबवली जात आहे.
या प्रकरणी खंडिया, आभा, बंटी आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीविरोधात बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून घडला? आरोपींचे कुटुंबाशी पूर्वीपासून काही वैमनस्य होते का? या हल्ल्यामागे नेमके काय कारण आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



