

धुळे : प्रतिनिधी
धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एकनाथ शिंदे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रविवारी (23 नोव्हेंबर) संध्याकाळी शासकीय निवासस्थानी असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे, शासकीय सेवेतून निवृत्त होण्यासाठी त्यांचे अवघे तीन महिने शिल्लक होते. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांचे निधन झाल्याने पोलीस दलासह कारागृह प्रशासनात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे दिवसभरातील कामकाज आटोपून संध्याकाळच्या सुमारास आपल्या शासकीय निवासस्थानी परतले होते. याचदरम्यान अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच निवासस्थानी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय उपचार सुरू होण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समोर येताच कारागृह विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
एकनाथ शिंदे यांनी 1997 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात आपल्या शासकीय सेवेची सुरुवात केली होती. प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी कारागृह प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. कामाचा अनुभव आणि प्रशासकीय जबाबदारी लक्षात घेऊन डिसेंबर 2020 मध्ये त्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी धुळे जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक म्हणून काम करताना कारागृहातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज, बंदिवानांशी संबंधित प्रक्रिया तसेच विभागाच्या विविध जबाबदाऱ्यांचे त्यांनी व्यवस्थापन केले. महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाच्या अधिकृत नोंदींनुसार, ते धुळे जिल्हा कारागृहात अधीक्षक आणि अपील अधिकारी म्हणून कार्यरत होते.



