

गोंदिया : वृत्तसंस्था
महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील बोंडराणी गावाजवळ वैनगंगा नदीच्या तीरावर पुण्यात एअरलाईन्स विभागात कार्यरत असलेल्या वर्षा तुरकर (वय ३५) यांचा रक्तबंबाळ अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १४) संध्याकाळी उघडकीस आली. त्या एका परिचित तरुणासोबत नदीकाठी फिरण्यासाठी गेल्या होत्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा तुरकर या शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता एका परिचित तरुणासोबत बोंडराणी येथील वैनगंगा नदीच्या तीरावर गेल्या होत्या. काही वेळानंतर उशिरा संध्याकाळी संबंधित तरुणाने वर्षा यांच्या नातेवाइकांना फोन करून घटनेची माहिती दिली. नातेवाईक तातडीने घटनास्थळी पोहोचले असता वर्षा या रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने खैरलांजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सायंकाळी सुमारे ७ वाजता त्यांना मृत घोषित केले. सोबत असलेल्या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, काही मुखवटाधारी व्यक्ती घटनास्थळी आल्या. त्यांनी वर्षा यांना मारहाण करून लूट केली. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा संबंधित तरुणाने केला आहे. विशेष म्हणजे, या कथित हल्ल्यात संबंधित तरुणाला कोणतीही दुखापत झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्या जबानीसह घटनेच्या सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच खैरलांजी पोलीस, वारासिवनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अनूप उईके आणि कटंगीचे एसडीओपी विकास सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. वर्षा यांचा मृत्यू खैरलांजी रुग्णालयात झाल्याने स्थानिक पोलिसांनी शून्य क्रमांकाने मर्ग दाखल केला आहे. घटनास्थळ महाराष्ट्राच्या हद्दीत असल्यामुळे या प्रकरणाचा तपास महाराष्ट्रातील दवनेवाडा पोलीस करत आहेत. शवविच्छेदनानंतर तपासासंबंधी कागदपत्रे महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
वर्षा तुरकर या पुण्यात एअरलाइन्स विभागातील तिकीट काउंटरवर कार्यरत होत्या. नातेवाइकांच्या माहितीनुसार, त्यांचा विवाह २०२४ मध्ये झाला होता. त्यांचे पती इंदूर येथे राहतात. त्यांना सुमारे अडीच वर्षांची मुलगी आहे. दिवाळीच्या सणानिमित्त त्या मुलीसह खैरलांजी तहसीलमधील नवेगाव येथील माहेरी आल्या होत्या. दरम्यान, वर्षा यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, त्यांच्यावर हल्ला झाला होता का आणि कथित लुटीच्या घटनेत कोणाचा सहभाग आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. नातेवाइकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



