

जळगाव : प्रतिनिधी
गेल्या ४ दिवसांपासून घरी न परतलेल्या गलू देवीदास कोळी (३८, रा. भोलाणे, ता. जळगाव) या तरुणाचा शेतामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही घटना शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) भोलाणे रस्त्यावर उघडकीस आली. दरम्यान, सदर तरुणाने ९ नोव्हेंबर रोजी आकाशवाणी चौकात एका जणाला सोडले व तेव्हापासून तो बेपत्ता होता. वळणावर दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोलाणे येथील गलू कोळी हे ९ नोव्हेंबर रोजी जळगावला आलेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाही. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते न सापडल्याने रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून नोंद करण्यात आली होती. तरुणाचा शोध सुरू असताना १३ रोजी जळगाव ते भोलाणे रस्त्यावर आसोदा शिवारात एका शेतात कुजलेला मृतदेह आढळला. याविषयी शेतकऱ्याने तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच गावातील तरुण बेपत्ता असल्याने गावकरीही तेथे पोहोचले असता दुचाकीवरून तरुणाची ओळख पटली
रामानंद नगर पोलिसांकडून शोध सुरू असताना आकाशवाणी चौकात सदर तरुणाने एका जणाला सोडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. त्यानंतर तरुणाचा शोध घेतला असताना भोलाणे रस्त्यावरून सदर तरुण जात असल्याचेही फुटेजमध्ये दिसले. गलू कोळी हे दुचाकीने घरी परतत असताना वळणावर त्यांची दुचाकी शेतात जाऊन पडली असावी व त्यात तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. तरुणाच्या खिशात मोबाईल आढळला असून चेहऱ्याला रुमाल बांधलेला होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



