

जळगाव : प्रतिनिधी
दीडशे वर्षांहून अधिक काळाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या जळगावच्या ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेच्या कामांना गती देण्यास सुरुवात केली आहे. रथोत्सव आणि वहन मिरवणुकीच्या मार्गांची तातडीने व सखोल स्वच्छता करण्याचे स्पष्ट निर्देश उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
संत आप्पा महाराज यांनी सुरू केलेल्या जळगावच्या श्रीराम रथोत्सवाला मोठी धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे. कार्तिक शुक्ल एकादशीच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात प्रभू श्रीरामाच्या रथासह विविध वहनांची भव्य मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होत असल्याने मिरवणूक मार्गांची स्वच्छता आणि नागरिकांच्या सुविधांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपमहापौर मनोज चौधरी यांनी रथ आणि वहन मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गांची स्वच्छता प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मिरवणूक मार्गावरील कचरा तातडीने उचलणे, रस्त्यांची साफसफाई करणे, नाले व गटारींची स्वच्छता करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
श्रीराम रथोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून जळगावच्या सांस्कृतिक परंपरेचे आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उत्सवात भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे उपमहापौरांनी स्पष्ट केले.
उत्सव सुरू होण्यापूर्वीच सर्व मिरवणूक मार्गांची स्वच्छता पूर्ण करावी. तसेच उत्सवादरम्यानही स्वच्छतेच्या कामात कोणतीही हयगय होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून कामांना गती देण्यावरही त्यांनी भर दिला. या आढावा बैठकीला उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांच्यासह महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे समीर बोरोले तसेच BVG संस्थेचे व्यवस्थापक रेड्डी, जाधव आणि राठोड उपस्थित होते. बैठकीनंतर उपमहापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मिरवणूक मार्गांची पाहणी करून स्वच्छतेची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाच्या निमित्ताने जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.



