

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याची आणि आपल्या रीलला अधिकाधिक लाईक्स मिळवण्याची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ आता धोकादायक वळण घेत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. इन्स्टाग्रामवर हटके रील बनवण्याच्या नादात एका २१ वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना वसईमध्ये घडली आहे. स्काय शॉट फटाका हातात धरून पेटवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा हातातच स्फोट झाला. या दुर्घटनेत तरुणाचा हात गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याच्या हाताला तब्बल ७२ टाके घालावे लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विनीत कुमार (वय २१) हा तरुण वसईतील मधुबन बिल्डिंग परिसरात काम करतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना अनेकजण त्याचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विनीतलाही इन्स्टाग्रामसाठी काहीतरी वेगळे आणि आकर्षक रील तयार करण्याची इच्छा झाली. नेहमीपेक्षा हटके व्हिडीओ तयार करण्याच्या प्रयत्नात त्याने स्काय शॉट फटाका हातात धरून पेटवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा प्रयोग त्याच्या चांगलाच अंगलट आला. फटाका पेटवल्यानंतर काही क्षणांतच आकाशात झेपावण्याऐवजी तो थेट विनीतच्या हातातच फुटला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, त्याच्या हाताला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर जखमी विनीतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या हाताची अवस्था गंभीर असल्याने डॉक्टरांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल साडेपाच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत त्याच्या हातावरील गंभीर जखमांवर उपचार केले. या दुर्घटनेत त्याच्या हाताला तब्बल ७२ टाके घालावे लागले. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याचा हात वाचवण्यात यश आले.
सोशल मीडियावर व्हायरल होण्याची इच्छा असणे गैर नाही; मात्र त्यासाठी स्वतःचा जीव आणि शरीर धोक्यात घालणे निश्चितच धोकादायक आहे. विशेषतः फटाके हातात धरून पेटवणे, स्फोटक पदार्थांसोबत स्टंट करणे किंवा केवळ व्हिडीओसाठी धाडसी प्रयोग करणे जीवघेणे ठरू शकते. काही सेकंदांच्या रीलपेक्षा आपले आयुष्य आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे, हा संदेश या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.



