

नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील प्रमुख देवस्थानांना नुकसान पोहोचवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आल्याने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि सप्तशृंगी गड या दोन महत्त्वाच्या देवस्थानांना हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड मंदिराच्या सुरक्षेत तातडीने मोठी वाढ करण्यात आली आहे.
काल हा ई-मेल मिळाल्याची माहिती समोर आली असून नाशिकचे पोलिस अधीक्षक डॉ.डी.एस. स्वामी यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील काही न्यायालयांना अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल आले होते. त्यानंतर आता प्रसिद्ध देवस्थानांना लक्ष्य करण्यात आल्याने पोलिस प्रशासनाने संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त अत्यंत कडक केला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सध्या या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड परिसरात अतिरिक्त 50 ते 60 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून CCTV फुटेजद्वारे प्रत्येक संशयास्पद हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ई-मेलमधील नेमका मजकूर आणि पाठवणाऱ्याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. भाविकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये. पोलिस प्रशासन संपूर्ण सुरक्षेसाठी कटिबद्ध असून वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



