

जळगाव : प्रतिनिधी
जामनेर ते जळगाव रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर दोन अनोळखी इसमांनी पोलिस असल्याची बतावणी करत एका ७१ वर्षीय वृद्धाची लूट केली. त्यांच्याकडील सुमारे २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लंपास केली. याप्रकरणी यशवंत मोतीराम पाटील (७१, चिंचखेडा बु, ता. जामनेर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यशवंत पाटील हे सोमवारी बँकेचे काम आटोपून नातू मयंक याला दिवाळीनिमित्त चिंचखेडा येथे घेऊन जाण्यासाठी जामनेरमध्ये आले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते दुचाकीने गावाकडे निघाले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहासमोर दोन अनोळखी इसमांनी त्यांना पोलिस असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखविले. तसेच हातात सोन्याची अंगठी घालून फिरू नका, असे सांगत अंगठी काढून देण्यास सांगितले. त्यानंतर अंगठी कागदाच्या पुडीत बांधून परत देण्याचे आश्वासन दिले. वृद्धाने विश्वास ठेवून हातातील सुमारे पाच ग्रॅम वजनाची अंगठी त्यांच्याकडे दिली. संशयितांनी अंगठी कागदाच्या पुडीत बांधून त्यांच्या खिशात टाकली आणि तेथून पोबारा केला. काही वेळाने पाटील यांनी पुडी उघडून पाहिली असता त्यात सोन्याच्या अंगठीऐवजी बनावट अंगठी आढळून आली.



