

भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ नगरपालिकेच्या संकीर्ण विभागाचे विभागप्रमुख वैभव सुरेश पवार (वय ३२) यांचे शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. हा अपघात भुसावळ येथील शिरपूर कन्हाळा रस्त्यावर झाला असून, या अपघातात त्यांच्यासोबत असलेल्या लहान भगिनीदेखील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे भुसावळ नगरपालिका वर्तुळासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वैभव पवार हे आपल्या भगिनीसोबत कारने (एमएच १९ ईपी ३२२२) प्रवास करीत होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. अपघाताची धडक इतकी भीषण होती की, वैभव पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या भगिनी गंभीर जखमी झाल्या. वैभव पवार हे भुसावळ नगरपालिकेत संकीर्ण विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. हसतमुख स्वभाव, सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची वृत्ती आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी पालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांचे अपघाती निधन झाल्याने मित्रपरिवार, सहकारी आणि परिचितांमधून तीव्र दुःख व्यक्त होत आहे.



