

जळगाव : प्रतिनिधी
सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा उचलण्यास सांगितल्याच्या राग आल्याने आरोग्य विभागातील मुख्य स्वच्छता निरीक्षक रुपेश भालेराव यांना शिवीगाळ करीत बदली करुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयित रईस उर्फ लाला हामीद खाटीक (रा. शाहूनगर) याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
महापालिकेच्या आरोग्य विभागात नोकरीस असलेले मुख्य स्वच्छता निरीक्षक रुपेश भालेराव हे दि. ३० ऑक्टोंबर रोजी शाहू नगर परिसरात गेले होते. त्यावेळी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांना मटन मार्केटजवळ सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा उचलण्यास रईस उर्फ लाला हामीद खाटीक याला सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने स्वच्छता निरीक्षकाला शिवीगाळ करीत मी तुमची बदली करुन टाकेल अशी धमकी दिली. दरम्यान, भालेराव यांनी शहर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.



