

चाळीसगाव : प्रतिनिधी
दगडी बँक म्हणून नावलौकिक असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आज चाळीसगाव सोसायटी गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
यावेळी जळगाव शहराचे आमदार श्री. राजूमामा भोळे, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री. रोहित निकम, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव महानगराध्यक्ष श्री. दीपक सूर्यवंशी, दूध संघाचे संचालक श्री. मधुकर राणे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महायुती पॅनलबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातील अंतिम निर्णय राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता कोणती राजकीय समीकरणे आकाराला येतात आणि महायुतीच्या पॅनलबाबत काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



